आषाढी वारीत 108 रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी ठरली जीवनदायी
923 भाविकांना अत्यावश्यक सेवा 11 हजार 94 भाविकांना रुग्णवाहिकेतून औषध वाटप
आषाढी वारीत 108 रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी ठरली जीवनदायी
*12 हजार 17 रुग्णांना दिली सेवा
*923 भाविकांना अत्यावश्यक सेवा : 11 हजार 94 भाविकांना रुग्णवाहिकेतून औषध वाटप
पंढरपूर ( दि.30):- आषाढी यात्रा कालावधीमध्ये वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालखी मार्ग व पंढरपूर शहरात डायल 108 च्या एकूण 110 रुग्णवाहिका कार्यरत होत्या. त्यासाठी ईओसी (कंट्रोल रुम) कक्ष तयार करण्यात आले होते. त्याव्दारे पंढरपूरातील सर्व भाविकांना 24 तास मोफत सेवा दिली गेली. यात्रा कालावधीत गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने मोबाईल नेटवर्कला अडथळे वारंवार येत असल्यामुळे या वर्षी सेवा लवकरात लवकर मिळावी, यासाठी 2 जी मोबाईल व वॉकीटॉकीची सुविधा सर्व रुग्णवाहिकामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली होती. पंढरपूरात अद्यावत असणारी कंट्रोल रुम वॉकीटॉकी सुविधा, जिओ मॅपींग या सर्व गोष्टीमुळे 108 रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी जीवनदायी ठरली.
आषाढी यात्रेत यावर्षी गंभीर स्वरुपाच्या 830 रुग्णांना व किरकोळ आजार असणाऱ्या 11 हजार 94 रुग्णांना सेवा देण्यात आली. एकूण 12 हजार 17 रुग्णांनी 108 या मोफत रुग्णवाहिकेतून सेवा देण्यात आली. आषाढी वारी कालावधीमध्ये एकात्मिक संनियंत्रण कक्षातून पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन ज्याठिकाणी भाविकाला रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे त्याठिकाणी तात्काळ रुग्णवाहिका पोहोचण्यास मदत झाली त्यामुळे भाविकांना तात्काळ आरोग्य सेवा देण्यास मदत मिळाली.
वारी कालावधीत भाविकांना आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे बीव्हीजी ग्रुप चे सीईओ डॉ. ज्ञानेश्वर शेळके व डॉ किशोर देव यांच्या मार्गदर्शनाखाली 108 रुग्णवाहिकेचे नियोजन करण्यात आले होते. आषाढी यात्रेचा सांगता समारोप दि. 30 जुलै 2026 रोजी एकात्मिक संनियंत्रण कक्ष, जुने एस.टी स्टॅन्ड येथे करण्यात आला. वारीमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टर व पायलट वकंट्रोल रुममधील सर्व कर्मचाऱ्यांचा प्रशासनाकडून यथोचित सन्मान करण्यात आला. या समारंभास मुख्याधिकारी महेश रोकडे, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी अशिष लोकरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजयकुमार सरडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, आयसीयु नोडल अधिकारी डॉ. महेश सूडके , सोलापूर जिल्हा व्यवस्थापक डॉ.अनिल काळे, डॉ. कौस्तुभ घाटोळे, सुनील चव्हाण, दिलीप शिंदे, युवराज वाघ तसेच 108 वरील काम करणारे डॉक्टर व ड्रायव्हर उपस्थित होते.



